मुंबई : सध्या विरोधकांच्या बैठकीचं (Opposition Meeting) सत्र सुरु आहे. याच बैठकीमध्ये विरोधी पक्षांकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विरोधी पक्षांनी चांद्रयान 3 (Chandrayan 3) च्या यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. दरम्यान याबाबत काँग्रेसने (Congress) ट्वीट करत माहिती दिली आहे. यामध्ये इस्रोच्या आगामी मिशन आदित्यला देखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी विरोधी पक्षांनी म्हटलं आहे की, "इस्रोच्या सर्व यशस्वी कामगिरीबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करत आहोत. त्यांच्या या यशामुळे देशाला त्यांचा कायमच अभिमान वाटत राहिल."
एकमताने प्रस्तावाला मान्यता
इस्रोच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये एकमताने मान्यता देण्यात आली. विरोधी पक्षांच्या या आघाडीने इस्रोच्या क्षमतेचा देखील उल्लेख केला आहे. यावर या प्रस्तावात म्हटलं आहे की, "इस्रोची क्षमता आणि विस्तार करण्यासाठी जवळपास सहा दशकं लागली. चांद्रयान-3 ने जगाला आश्चर्यचकित केलं आहे. तर आता 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मिशन आदित्यच्या प्रक्षेपणाकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आम्हाला आशा आहे की इस्रोच्या या कामगिरीमुळे आपल्या तरुणांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल."
भारताची अंतराळ संशोधन संस्थेने 23 ऑगस्ट रोजी इतिहास रचला. त्यानंतर सर्व स्तरातून इस्रोचं कौतुक करण्यात आलं. अगदी विरोधकांनी देखील इस्रोच्या या कामगिरीचं तोंड भरुन कौतुक केलं. आता बैठकीत मंजूर करण्यात आलेला अभिनंदनपर प्रस्ताव हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.
इस्रोकडून मिशन आदित्यची तयारी सुरु
विरोधी पक्षांनी त्यांच्या या अभिनंदनपर प्रस्तावामध्ये इस्रोच्या मिशन आदित्यला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. इस्रोचं मिशन आदित्य हे 2 सप्टेंबर रोजी सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. इस्रोचं आदित्य एल1 हे यान सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे इस्रोच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिल आहे.
मुंबईत विरोधकांच्या बैठकीचं सत्र
मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये विरोधकांच्या बैठकीचं सत्र सुरु आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं देखील अनावरण करण्यात येणार होतं. पण हे अनावरण आता पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.