Independence Day 2023 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 'माझी माती-माझा देश' अभियान राबवलं जात आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून (13 ऑगस्ट) ते 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण मुंबई महानगरात ‘हर घर तिरंगा’ म्हणजेच ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावा याकरीता मुंबईत डाक विभागाची 224 कार्यालये, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या पाच रेल्वे स्थानकांवर देखील राष्ट्रध्वज खरेदी करता येऊ शकतील. सर्व मुंबईकरांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकर नागरिकांना केलं आहे.  


देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' गेल्या वर्षभरापासून साजरा करण्यात येतोय. आता हा महोत्सव समारोपाकडे वाटचाल करीत आहे. हे अभियान 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविले जाणार आहे. या निमित्ताने 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या अभियानाने अमृत महोत्सवाची सांगता होत आहे. या अभियानात शिलाफलकम, पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन, मिट्टी यात्रा असे उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.


केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, 'हर घर तिरंगा' उपक्रमात प्रत्येक घर, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. 


दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट या तीन दिवशी नागरिकांना आपल्या घरी/इमारतीवर दिवसा व रात्री (अखेरच्या दिवशी सूर्यास्तापर्यंत) राष्ट्रध्वज फडकवता येईल. मात्र, सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त दिवसा ध्वज फडकवावा. म्हणजेच शासकीय कार्यालये आणि संस्थांना रात्री तिरंगा फडकविण्यास परवानगी नाही.


'घरोघरी तिरंगा' अभियानात मुंबईकरांनी गत वर्षी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे या वर्षी देखील मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. 


या 5 रेल्वे स्थानकांवर ध्वज विक्रीची व्यवस्था


त्याचप्रमाणे मुंबईतील पाच मुख्य रेल्वे स्थानकांवरही तिरंगा ध्वज विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.