मुंबई: एकेकाळी अंडरवर्ल्डमधील गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख असणारे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर खात्याकडून (Income Tax) धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळी आयकर खात्याचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पवई येथील निवासस्थानी दाखल झाले. तेव्हापासून शर्मा यांच्या घरी आयकर अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरु आहे. या तपासादरम्यान घरातच प्रदीप शर्मा यांचे आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांशी भांडण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयकर खात्याने मदतीसाठी मुंबई पोलिसांना पाचारण केले आहे.


सकाळी साधारण आठ वाजण्याच्या सुमारास आयकर खात्याचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पवई येथील एव्हरेस्ट हाईट या इमारतीमधील निवासस्थानी येऊन धडकले. तेव्हापासून प्रदीप शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरु आहे. प्रदीप शर्मा आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांचा वाद झाला. त्यानंतर घरातील महिलांमध्ये झटापट झाल्याचे समजते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता प्रदीप शर्मा यांच्या घरी सशस्त्र महिला पोलीस अधिकाऱ्याला बोलावण्यात आले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पत्नीचा मोबाईलही जप्त केल्याची माहिती आहे. शर्मा यांच्या घरी सुरु असलेल्या तपास मोहीमेतून आता काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


नेमकं प्रकरण काय?


उत्तर प्रदेशातील एका बिल्डरशी असलेल्या व्यावसायिक संबंधांमुळे प्रदीप शर्मा यांच्या घरी धाड टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. उत्तर प्रदेशातील दिवंगत खासदार रमेश दुबे यांचे पुत्र असलेल्या पप्पू दुबे यांच्या व्यवसायात प्रदीप शर्मा यांनी गुंतवणूक केल्याचा संशय आयकर खात्याला आहे. शर्मा यांच्याशिवाय या व्यवसायात एका आयएएस अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने आयकर खात्याचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी तपास करत आहेत. मात्र, आयकर खात्याचे अधिकारी आपल्यावर जबरदस्ती करत असल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांनी केला आहे. आयकर विभागाचे अधिकारी आमचे मोबाईल खेचून घेत आहेत. यावरुन प्रदीप शर्मा यांची आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांशी झटापट झाली. प्रदीप शर्मा यांच्या मुलीने प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी तिला मीडियाशी बोलण्यास मज्जाव केला. आयकर खात्याने शर्मा यांच्या घरी धाड टाकून आठ तास उलटून गेले आहेत. आतापर्यंतच्या तपासात आयकर खात्याच्या हाती कोणती माहिती लागली आहे, याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.


प्रदीप शर्मांच्या घरी नक्की काय घडलं?


प्रदीप शर्मा यांच्या पवईतील घरी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सकाळी धाड टाकली. आपल्या घरी धाड पडणार याची कुणकुण अगोदरच प्रदीप शर्मा यांना लागली होती. त्यामुळे प्रदीप शर्मा सकाळी सव्वा सात वाजताच घरातून बाहेर पडले. त्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास आयकर खात्याचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी दाखल झाले. त्यांना प्रदीप शर्मा घरी नसल्याचे समजले. त्यामुळे आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी इमारतीमधील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये प्रदीप शर्मा सव्वा सात वाजता घरातून बाहेर पडल्याचे दिसून आले. अखेर सकाळी ११ वाजता प्रदीप शर्मा आपली गाडी बाहेर लावून घरापर्यंत चालत आले. त्यांनी नेमके असे का केले, हे अद्याप समजू शकलेले नाही.


कोण आहेत प्रदीप शर्मा?


प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांची कारकीर्द अतिशय वादात राहिली. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध अशा आरोप प्रकरणात २००८ मध्ये प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.



आणखी वाचा


पोलीस आणि गुंडांच्या राजकारणामुळे मला जेलमध्ये जावं लागलं : प्रदीप शर्मा