मुंबई : राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

जीवनावश्यक क्षेत्रासाठी काम करत असलेली खाजगी कार्यालये वगळून अन्य सर्व कार्यालयेही बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचं या काळातील सुट्टीचं वेतन कापू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. फेसबुक लाईव्हवरुन राज्याला उद्देशून संवाद साधला, त्यात त्यांनी ही घोषणा केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर आणि यूट्यूब या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला होणारी पत्रकार आणि अन्य माध्यमकर्मींची गर्दी टाळण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांसोबत आजच्या संबोधनात राज्यातील प्रशासनाचे प्रमुख मुख्य सचिव अजॉय मेहता आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे ही होते.

आजच्या संबोधनाच्या सुरवातीलाच मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूंच्या युद्धात राज्यातील जनतेचं सहकार्य मिळत असून त्यांचे आभार मानले. नागरिकांनी घरातच राहावं, यासाठी चित्रपत्रसृष्टीतले अनेक दिग्गज वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत असल्याबद्धल त्यांनी अमिताभ बच्चन, रोहित शेट्टी वगैरेसारख्या बड्या कलाकारांचे आभार मानले.

कोरोना विषाणूंचा सर्वाधिक प्रादूर्भाव होण्याची भिती असलेल्या मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. जीवनावश्यक वस्तूंमध्ये अन्नधान्याची विक्री करणारी किराणा मालाची दुकाने, दूध विक्री करणारी केंद्र तसंच औषधाची दुकाने यांचा समावेश आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या महानगरातील खाजगी दुकाने आणि कंपन्यांच्या बंद करण्याच्या निर्णयाविषयी कुणाला काही शंका असतील तर ते जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करु शकतात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.