मुंबई : अमृतसरमध्ये रेल्वे रुळावर उभं राहून रावण दहन पाहणाऱ्यांपैकी 61 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. मुंबईतही दररोज रेल्वे अपघातात 10 ते 12 जण मृत्यूमुखी पडतात, ही आकडेवारी माहिती अधिकारात उघड झाली आहे.

मुंबईची लोकल मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे. मात्र लोकलने प्रवास करताना गर्दीमुळे अनेक जण जीव धोक्यात घालत दरवाजात उभं राहून प्रवास करतात. तसेच घाईत रेल्वे रुळ ओलांडतानाही अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार मुंबईत रेल्वे रुळांवर 2013 ते 2018 या पाच वर्षात एकूण 18 हजार 423 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 18 हजार 847 लोक जखमी झाले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे 2013 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे रुळ क्रॉस करताना किती लोकांचा मृत्यू किंवा जखमी झाले? याची माहिती मागितली होती. त्यानंतर मुंबई रेल्वे पोलिसांच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती पुरवली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिले आहे. परंतु रेल्वे प्रशासनचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं शकील अहमद यांनी म्हटलं.

रेल्वेतून पडून किंवा रुळ ओलांडताना मृत्यूची आकडेवारी

वर्ष                   मृत्यू                 जखमी

2013                 3506                3318

2014                 3423                3299

2015                 3304                3349

2016                 3202                3363

2017                 3014                 3345

2018                 1974                 2173