मुंबई : बँडस्टँडमध्ये चाफ्याचा सुगंध दरवळावा, यासाठी राज्यसभेच्या माजी खासदार आणि दिग्गज अभिनेत्री रेखा हटून बसल्या आहेत. मुंबईतील बँडस्टँडमध्ये चाफ्याची लागवड करणार असाल, तरच खासदार निधी देईन, अशी भूमिका रेखा यांनी घेतल्याची माहिती आहे.

रेखा यांच्या खासदार निधीतून बँडस्टँडवर 200 चाफ्याची झाडं लावली जाणार आहेत. सेंट्रल पार्कच्या जागेच्या एक किलोमीटरच्या पट्ट्यात समुद्रकिनारी तब्बल 2 कोटी 60 हजारांची चाफ्याची झाडं लावायची ठरली आहेत.

दोन कोटींच्या खासदार निधीतून चाफ्याचीच झाडं लावली पाहिजेत, असा रेखा यांचा आग्रह आहे. मात्र स्थानिक आणि बांद्रा बँडस्टँड रेसिडेन्शिअल ट्रस्टने याला विरोध केला आहे.

झाडं लावल्यानंतर त्यांच्या व्यवस्थेसाठी येणारा खर्च कोणी करायचा, हा प्रश्न अनुत्तरित आहे. तसंच ही 200 चाफ्याची झाडं समुद्रकिनारी कितपत तग धरु शकतील यावरही शंका आहे.

या ठिकाणी इतर स्वरुपाचं सुशोभिकरणही करता येऊ शकतं. मात्र चाफा असेल तरच खासदार निधी देईन अशी भूमीका रेखा यांनी घेतल्याचं समजतं. खासदारकीची टर्म संपताना निधी राहिल्याने आता रेखा यांनी घाईघाईत तो वापरायला घेतला.