Indian Railway No concessions for seniors citizens:   भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटा मधील देण्यात येणारी सवलत सध्यातरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना याचा फटका बसणार आहे. कोरोना पूर्वी लांब पल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेस, राजधानी, दुरंतो, शताब्दी असा सर्व गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात विशेष सूट लागू होती. मात्र मार्च 2020 ला लॉकडाऊन सुरू झाले आणि भारतीय रेल्वे पूर्णतः थांबली. सोबतच तिकीट दरात सर्व प्रकारच्या सूट देखील बंद करण्यात आल्या. यामध्ये मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात येणारी सूट महत्त्वाची होती. मात्र आता ही सूट देखील मिळणार नाही. 


वित्तीय वर्ष 2019-20 पेक्षा वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये रेल्वेला प्रवाशांच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळाली आहे. तिकीट दरात देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे खुप मोठे ओझे भारतीय रेल्वेवर पडत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसह अन्य काही श्रेणीतील प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सूट बंद करण्यात येत आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.


इतकेच नाही तर रेल्वे बोर्डाला एका माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नत देखील, रेल्वे बोर्डाने हे स्पष्ट केले आहे की, आता ही सूट मिळणार नाही. कोरोना काळात कमीत कमी प्रवाशांनी रेल्वे प्रवास करावा यासाठी सर्व प्रकारच्या सवलती बंद करण्यात आल्या होत्या. जेणेकरून प्रवासी कमी असल्याने कोरोनाचा प्रसार देखील कमी होईल. मात्र आता रेल्वेने सर्वच निर्बंध उठवले आहेत. भारतीय रेल्वे पुन्हा एकदा 100% क्षमतेने धावत आहे. मग ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत का नाही? असा सवाल अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडला आहे...


कोरोना पूर्वी 60 वर्षावरील पुरुषांना 40 टक्के तर 58 वर्ष वरील महिलांना 50 टक्के तिकीट दरात सूट देण्यात येत होती. नाही म्हणायला भारतीय रेल्वेने दिव्यांग, 11 प्रकारचे आजार असलेले पेशंट आणि विद्यार्थ्यांना रेल्वे तिकीट दरातील सूट पुन्हा लागू केली आहे. मात्र या सोबतच ज्येष्ठ नागरिकांना देखील ही सूट देण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत.


भारतातील रेल्वे प्रवाशांमध्ये गोरगरीब जनतेचे प्रमाण हे 80 टक्के आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तिकीट दरात मिळत असलेल्या सवलतींमुळे या प्रवाशांना दोन पैसे अधिकचे बचत करता येत होते. मात्र रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या दुर्दैवी निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक प्रवाशांवर याचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत.



 LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha