मुंबई : मुंबईतील कोरोनाचं प्रमाण काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मुंबईत एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आल्याचं दिसून येत आहे. मुंबईत लसीकरणावर देखील जोर दिला जात आहे. लसीकरणाबाबत (Mumbai Vaccination) महत्वाची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी (BMC Suresh Kakani) यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला आहे. जून महिन्यात जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. प्रत्येक सेंटरवर 300 लसी दिल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, मुंबईत गर्दीचं नियोजन करता यावं याकरता 18 ते 44 वयोगटामध्ये दोन उपगट करण्यात आलेत. यांपैकी राज्याच्या संमतीनं 30 ते 44 च्या वयोगटाचं लसीकरण सुरु झालं आहे. मुंबईत 18 ते 44 वयोगटात 50 लाख लोकसंख्या आहे.पुढचा एक आठवडा 2 उपगटांनुसार लसीकरण प्रक्रीयेचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा नवं नियोजन करणार आहोत, असं ककाणी यांनी सांगितलं.
ककाणी यांनी सांगितलं की, गेल्या 3 महिन्यांत एप्रिल- 8 लाख 70 हजार, मे- 4 लाख 57 हजार, जून- आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त मुंबईला लसपुरवठा झाला आहे. 75 % लससाठ्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. ज्याकडून मुंबई महापालिकेला लस साठा मिळतो. लस साठा वाढल्यास अधिक लस केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.
कांदिवलीतील बनावट लसीकरण प्रकरणाबाबत ते म्हणाले की, यासंदर्भात सीरम इन्स्टिट्युटला महापालिकेकडून बॅच क्रमांकांच्या तपासणीबाबत पत्र दिले होते. सीरमकडून उद्यापर्यंत प्रतिसाद अपेक्षित आहे. पोलिस तपास या प्रतिसादानुसार केला जाऊ शकेल, असं ककाणी यांनी सांगितलं.
स्वाईन फ्लु केसेससंदर्भात बोलताना ककाणी म्हणाले की, एच1 एन 1 गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या केसेस कमी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी 50 टक्केपेक्षा कमी केसेस समोर आल्या आहेत.
डेल्टा व्हेरीएंट बोलताना त्यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये डेल्टाचे रुग्ण नाहीत. मात्र, मुंबईजवळील इतर जिल्ह्यांमध्ये काही रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. प्रत्येक आठवड्यात डेल्टा व्हेरिअंटसाठी 50 सॅम्पल चेक केले जात असल्याचं ककाणी यांनी सांगितलं.