मुंबई : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरुन मुंबई सध्या अनलॉकच्या पहिल्या गटात आहे. परंतु तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच कायम राहणार आहे. म्हणजेच मुंबईत सध्यातरी लोकल सेवा सुरु होणार नाही. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं असून शहरात आजपासून 27 जूनपर्यंत लेव्हल 3 चे निर्बंध कायम राहतील.


7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होण्यास सुरु झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने 5 जून रोजी पहाटे याबाबतची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार पहिल्या स्तरामध्ये येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधि असतील, तर तर पाचव्या स्तरातील निर्बंध अधिक कडक असतील. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या स्तरातच राहिल असं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. 


मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 3.79 टक्के आणि व्याप्त ऑक्सिजन बेड क्षमता 23.56 टक्के आहेत. या आकडेवारीनुसार मुंबई खरंतर लेव्हल 1 मध्ये आहे. मात्र, खालील बाबींचा विचार करुन मुंबईला लेव्हल 3 चेच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 


1. मुंबईची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या घनतेचे प्रमाण


2. मुंबईत एमएमआर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या


3. टास्क फोर्स आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेली तिसऱ्या लाटेची शक्यता


दरम्यान तीन दिवसांपूर्वी म्हणजेच मागील आठवड्यात 'एबीपी माझा'शी बोलताना इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं होतं की, "कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2 ते 2.5 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी झाला तर येत्या आठवड्यात (चालू आठवड्यात) मुंबई लेव्हल 2 मध्ये आणण्याचा विचार करुन आणखी नियमांमध्ये शिथिलता आणली जाईल." 


मुंबईत गेल्या 24 तासात 758 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत रविवारी (20 जून) 24 तासात 758 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 24 तासात 19 मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 682307 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 18,764 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 734 दिवसांवर गेला आहे.