मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना गेल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणार गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते.


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच म्हटलं होतं की कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. या आज मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियामांचे पालन नागरिकांना करावे लागेल. 


Maharashtra Corona Cases Update | राज्यात आज कोरोना रुग्णवाढीला ब्रेक; तरीही आकडा मोठाच


काय म्हणाले होते आरोग्यमंत्री?


कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील. कोरोना बाधित रुग्णसंख्ये मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात  आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे, असंही ते म्हणाले. 


राज्यात काल 24 हजार 645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ


राज्यात काल 24 हजार 645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. एकूण 2234330 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 215241 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.