मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आमदार बच्चू कडू यांनी सातत्याने यासंदर्भात आंदोलनं केली होती. त्याचबरोबर, मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय खालीलप्रमाणे :
- अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यामध्ये 7 हजार सौर कृषी पंप लावण्यास मंजुरी.
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 40 टक्के ते 79 टक्के दिव्यांगांना 800 रुपये तर 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्याचा निर्णय.
- राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापण्यात येणार.
- मत्स्यव्यवसाय विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ससून गोदी बंदराच्या नूतनीकरणास सुधारित प्रशासकीय मान्यता.
- रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन्यास मान्यता.
- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2017-18 या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून तीस रुपये वाढीव भरडाई दर.
- वस्तू व सेवा कर परिषदेने शिफारस केल्यानुसार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम-2017 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
- महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनियम-2014 मधील विविध कलमांत सुधारणा करण्यासाठी विधेयक सादर करण्यास मान्यता.