मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेस यांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांशी विसंगत अशी युती असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची युती म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत असल्याचंही राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकर ओवेसी यांच्या युतीचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे आता सांगता येणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना भाजपचा पराभव करायचा असेल तर त्यांनी मुस्लीम लीगच्या विचारांच्या लोकांशी युती करणं अपेक्षित नाही, असंही राऊत म्हणाले.
तसेत 2019च्या निवडणुकीत अनुसुचित जाती-जमाती आणि मुस्लीम समाजाची मतं काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाना मिळू नयेत, यासाठी भाजपची ही खेळी असल्याचा आरोप होत आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असले तरी गेल्या अनेक निवडणुका पाहिल्या तर आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभी राहिली, असं चित्र दिसलं नाही. तसेच ही युती बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी विसंगत युती आहे, हे देखील राऊत यांनी नमूद केलं.
आंबेडकरी समाज जागृक आहे, त्यामुळे केवळ राजकीय हेतूसाठी दोन भिन्न विचारांची युती हा समाज स्वीकारणार नाही. त्यामुळे या युतीचा लाभ होणार नाही असा अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ : आंबेडकर-ओवेसी यांच्या युतीवर काय म्हणाले संजय राऊत?