मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुबईला चांगलंच झोडपले. अशातच 13 आणि 14 जूनला  मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


पुढील 4-5 दिवस कोकणात अती तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन  हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. 


मुंबई महानगरपालिका सज्ज 


हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिका देखील सज्ज झाली असून समुद्र किनारे व समुद्र किना-यांलगतचा परिसर इत्‍यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे.





  • विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला आहे.

  • मुंबई महानगरपालिकेचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष हे वश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज आहेत.

  • महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह  तैनात करण्यात आली आहे 

  •  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरता तत्पर आहे.

  • भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरिता तत्पर आहेत.

  • बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे आले असून त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत.

  • मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतत्पर आहे.

  • आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.

  • मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. त्वरीत मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.

  • महापालिकेच्या 24  विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून महापालिका शाळा सुसज्ज करण्यात आल्या  आहेत