नवी मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री जगभर पार्ट्या केल्या जातात. परंतु या पार्ट्यांसाठी प्रशासनाची परवानगी घेतली जात नाही. परंतु प्रशासनाच्या परवानगीविना नवी मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल आणि पबमध्ये पार्टी करणाऱ्यांना आता अटक होऊ शकते.
नवी मुंबईत सोसायटी, मैदान, गच्ची, हॉटेल, पब तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थर्टी फर्स्टची (31 डिसेंबर) पार्टी करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेता पार्ट्या केल्या तर अशा लोकांना अटक होऊ शकते, यासंदर्भातील परिपत्रक नवी मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे.
पार्ट्या करणाऱ्या लोकांसह 31 डिसेंबरच्या रात्री परवानगीविना डीजे वाजवणाऱ्यांवर, लाऊडस्पीकर्स लावणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. तसेच हॉटेल किंवा पब मालकांनी परवानगीविना पार्ट्यांचे आयोजन केले, या पार्ट्यांसाठी डीजे किंवा लाऊडस्पीकर्स लावले तर हॉटेल आणि पब व्यावसायिकांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.
31 डिसेंबरच्या रात्री शहरात कोठेही ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचे प्रकार आढळल्यास अशा चालकांचे चालक परवाने रद्द होऊ शकतात. ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह विरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.