मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघातील बदलापूर शहरात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी झालेली गर्दी पाहून कपिल पाटील हे कोरोना नियम पाळण्याचं आवाहन करताना दिसून आले. कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता.  त्यांच्या भोवताली स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होता. मात्र यावेळी अनेक कार्यकर्ते फोटो सेशनसाठी मास्क काढून बुके देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ज्याने मास्क घातला असेल त्याच्याच हातून बुके घेऊ, अशी भूमिका घेत कपिल पाटील यांनी अनेकांना मास्क घालायला लावले. 


मात्र त्यांच्या स्वागतासाठी झालेल्या जीवघेण्या गर्दीतून कोरोना वाढू नये, हीच अपेक्षा व्यक्त होतेय. या यात्रेतील गर्दी प्रकरणी कल्याण डोंबिवलीत चार गुन्हे दाखल करण्यात आले असून आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरातही गुन्हे दाखल होतात का, हे पाहावं लागणार आहे.


यावेळी बोलताना कपिल पाटील म्हणाले की, जनतेने आपल्याला दोनदा मोठ्या विश्वासाने लोकसभेत पाठविले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले. जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पाटील यांनी कल्याण, शहाड, उल्हासनगर, टिटवाळा, बदलापूर परिसरात जनतेशी संवाद साधला.  


कल्याण पश्चिम मधील दुर्गाडी चौकातून सकाळी सुरू झालेली यात्रा कल्याण शहरातील सहजानंद चौक, शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर उद्यान, नेताजी सुभाष चौक, सिंधी गेट मार्गे शहाड येथे पोहोचली. शहाड, मोहने गाव, बल्याणी चौक मार्गे टिटवाळा येथे यात्रा पोहोचली तेव्हा पावसाने चांगलाच जोर धरला होता.  


टिटवाळा येथे श्री महागणपतीला मंदिराबाहेरूनच देशाला लवकर कोरोनामुक्त करण्याचे गाऱ्हाणे घातले गेले. त्यानंतर गोविली, म्हारळ मार्गे यात्रा उल्हासनगर येथे आली. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांबरोबर  संवाद साधण्यात आला. नागरिकांनी  ठिकठिकाणी पाटील यांना विविध विषयाबाबतची निवेदने दिली.