पालघर : जिल्ह्यात सध्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था असून आज जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार होते. हे सर्व बोईसर पालघर मार्गावरून प्रवास करणार आहेत. यामुळं दौऱ्याआधी या मार्गाच्या दुरुस्तीचे काम भर पावसात काल सुरू करण्यात आले. त्यामुळे कधी नव्हे त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आल्याचं पाहायला मिळालं. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी पालघर दौराच रद्द केला आहे.
ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झाला असल्याची माहिती आहे. दूर दृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे ,राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत.
पालघरमध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी
जिल्ह्यात डहाणू जव्हार नाशिक,मनोर वाडा भिवंडी तसेच ग्रामीण भागात महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. बोईसर पालघर रस्त्यावरून ही मोठी रहदारी असून या मार्गाची मागील अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्था होती. या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या रस्त्यांची दुरावस्था काही सुधारलेली येथील स्थानिकांना पाहायला मिळत नाही. मात्र आज पालघर जिल्हा मुख्यालयाचा उद्घाटन समारंभ असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बडे मंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळल्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आली आणि भर पावसात त्यांनी रस्त्यांच्या डागडुजीचं काम हाती घेतलं.
नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्यानं जिल्ह्यात रोज मंत्री यावे आणि रोज आमचे रस्ते तयार व्हावे अशी अपेक्षा पालघर मधील जनता सध्या करत आहे. जिल्ह्यात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जातो. मात्र असे असताना देखील या रस्त्यांची दुरावस्था फारशी सुधारलेली पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोन विभाग या भागाच्या मुख्य अभियंता यांचे ठाणे येथे कार्यालय आहे. मात्र या अभियंत्यांना पालघर करांची रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणारी हेळसांड दिसत नाही.