मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला थोडयाच वेळात सुरुवात  झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नारायण राणे म्हणाले की,  उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत. जनतेचा प्रतिसाद पाहता, महाविकास आघाडीला कंटाळलेली आहे, असं राणे म्हणाले. 


राणे म्हणाले की, मी प्रथमच एवढे दिवस दिल्लीत राहिलो. मी काम आणि विकास करू शकेल या विश्वासाने फडणवीस यांनी मला दिल्लीला पाठवले.  फडणवीस यांनी ज्या उद्देशाने पाठवले त्या उद्देशाने मोदी यांना पाठबळ देणार आहे आणि देश आघाडीवर कसं जाईल यासाठी प्रयत्न करेल, असं राणे म्हणाले. राणे म्हणाले की, गर्दी कमी करायच्या मी विरोधात आहे, फक्त नियम पाळा. दीड महिना मंत्री होऊन झाला, एक वेगळा अनुभव मिळाला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यावर आपण नवीन मंत्री झालो अस वाटलं नाही, असंही राणे म्हणाले. 


राणे म्हणाले की, हे राज्यातील जनतेचं पद आहे. जनतेची सेवा, विकास, रोजगार निर्माण करणार. जीडीपी मध्ये देश आघाडीवर असावा यासाठी प्रयत्न करणार.  महाराष्ट्राचं नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. 


हे खंडणी वसूल सरकार - देवेंद्र फडणवीस
यावेळी रथावरती नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की,  राणेंना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. मोदींना राणेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्य पिछाडीवर आहे. हे खंडणी वसूल सरकार आहे, असं ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, राणेंची यात्रा ही साधी असूच शकत नाही, म्हणून वरुण राजाचा आशीर्वाद आहे. मंत्रिमंडळात सार्वजनिक भौगोलिक प्रतिनिधित्व मिळालं. बहुजनांचा नेतृत्व मिळालं, असं ते म्हणाले.