मुंबई : 'पीडित महिलेलाच प्रकरण पुढे वाढवायचं नाही तर इतरांनी याबाबत बोलू नये, असं सूचक विधान 'मी-टू' या मोहिमेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. तसंच मी टू ही चळवळ केवळ पीडित महिलांसाठी आहे, बाकी कुणीही त्याआडून आपली मतं आणि अजेंडा मांडणं योग्य नाही. अन्यथा हे सारं कुठे जाऊन थांबेल याचा नेम नाही. त्यामुळे अशा प्रकरणांत तक्रार नोंदवताना काहीतरी नियमावली बनवण्याची गरज असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलंय.


'मी-टू' मोहिमेअंतर्गत एका पीडित महिलेने बॉलिवूडचा दिग्दर्शक विकास बहलवरही गंभीर आरोप केलेत. मात्र या महिलेने कोर्टापुढे येण्यास नकार दिलाय. 'मी आधीच खूप सोसलंय, तेव्हा आणखीन नको. मला यात आता पडायचं नाही, असं विधान पीडित महिलेच्या वकिलांनी हायकोर्टात केलं. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सायंकाळी उशिरा यावर सुनावणी झाली.

मी-टू प्रकरणात एका महिलेने बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता विकास बहल यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. या संदर्भात विकास बहलने आता फँटम फिल्ममधील त्याचे माजी सहकारी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय. हे दोघेही जण संधीसाधू असून त्यांच्या तथ्यहीन आणि बदनामी करणाऱ्या वक्तव्यांमुळे माझं मोठं नुकसान झालंय, असं म्हणत विकासने 10 कोटींची नुकसान भरपाई मागत या दोघांविरोधात दावा ठोकलाय. मात्र जर हे प्रकरण पीडित महिलाच वाढवू इच्छित नसेल, तर इतरांनी हे प्रकरण आपापसांत मिटवावं, असा सल्लाही यावेळी हायकोर्टाने दिलाय.

यात दोन्ही बाजूंनी सामंजस्याने मार्ग काढावा, असं हायकोर्टाने सुचवत विकास बहल, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्यासह बहलवर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या फँटम फिल्मच्या त्या महिला कर्मचाऱ्यालाही हायकोर्टात हजर राहाण्याचे निर्देश दिले होते. मात्र अनुराग कश्यप कामानिमित्त बाहेरगावी असल्याने शुक्रवारच्या सुनावणीस उपस्थित राहू शकला नाही. मंगळवारी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

2011 साली अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि निर्माता मधू मँटेना यांनी फँटम फिल्म्सची स्थापना केली होती. या कंपनीमार्फत त्यांनी एकापेक्षा एक सरस अशा हिट चित्रपटांची निर्मिती केली. मी-टू चळवळीत विकास बहलचं नाव समोर येताच ही कंपनी बंद करण्याचा निर्णय बहल व्यतिरिक्त इतर तिघांनी घेतला.

या कंपनीतील एक महिलेने 2015 साली प्रदर्शित झालेल्या बॉम्बे वेल्वेट या सिनेमाच्या प्रसिद्धीकरता गोव्यात असताना आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप विकास बहलवर केला आहे. नुकतीच ही बाब समोर आल्यानंतर कंपनी बंद करण्याची घोषणा करण्यात आली.