मुंबई | भाजपच्या तीन वादग्रस्त प्रवक्त्यांना माध्यमांवर जाण्यास पक्षाकडून तूर्तास बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून राम कदम, मधू चव्हाण आणि अवधूत वाघ यांना प्रवक्ते म्हणून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील वादग्रस्त विधानं आणि पराक्रम प्रवक्त्यांना भोवल्याचं बोललं जात आहे. राम कदम यांनी दहीहंडीवेळी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. महिला आयोगानेही त्यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना प्रवक्तेपदापासून दूर केलं आहे. मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप समोर आल्यामुळे आणि अवधूत वाघ यांनी मोदींना विष्णूचा अकरावा अवतार म्हटल्यांचं ट्विट केल्यामुळे पक्षाने या तिघांवरही कारवाई केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने भाजपने ही कारवाई केली आहे.