मुंबई : माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना 26 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 26 ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिल्याची माहिती पुणे पोलिसांतर्फे हायकोर्टात देण्यात आली. त्यामुळे याच प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांच्यावर 26 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.


माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी आहेत. माओवाद्यांशी वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा संबंध आहे, अशा आरोपाखाली पुणे पोलिसांनी काहींना अटक केली होती. त्यात नवलखा यांचाही समावेश होता. त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, इतर सामाजिक कार्यकर्त्यांसह त्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र, त्याविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यानंतर नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. 'माझ्याविरुद्ध पुणे पोलिसांकडे कोणतेही पुरावे नसून, मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यामुळे माझ्याविरुद्धचा गुन्हा रद्द करण्याचे निर्देश द्यावेत', अशी विनंती नवलखा यांनी याचिकेत केली आहे.