मुंबई : जर रस्ताच खराब असेल तर केवळ चालकाला अपघातासाठी जबाबदार धरता येणार नाही, असा निर्वाळा देत मुंबई दंडाधिकारी कोर्टानं एका रिक्षा चालकाला 11 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणातून निर्दोषमुक्त केलं आहे. सूरजकुमार जयस्वाल असं या रिक्षाचालकाचं नाव असून सध्या तो एक पान टपरीचं दुकान चालवतो.
काय घडली होती घटना?
7 जून 2010 रोजी नसीन बगदादी ही बुजूर्ग महिला आपली मुलगी स्नेहल देसाई आणि दोन नातवंड दनेश आणि साहील यांच्यासह गोरेगावहून मीरारोडच्या दिशेनं जयस्वाल यांच्या रिक्षानं जात होती. आरे कॉलनीतील तलाव परिसरात अचानक रिक्षाचा ताबा सुटला आणि ती पलटी झाली. ज्यात नसीन यांच्या बरगड्यांमध्ये आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तर मुलगी स्नेहल यांच्या पायालाही मार लागला. या घटनेनंतर सूरजकुमार जयस्वाल घाबरून तिथनं पळून गेला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी नसीन आणि त्यांच्या कुटुंबाला हॉस्पिटसमध्ये दाखल केलं.
नसीन यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितलं होतं की, जयस्वाल हा रिक्षा अतिशय जोरात आणि बेफीकरीनं चालवत होता. वास्तविक मॉन्सूनचे दिवस असल्यानं रस्ता बराच खराब झाला होता. मात्र जयस्वाल अतिशय वेगात 'झिगझॅग' करत, खड्डे चुकवत रिक्षा चालवत होता. दुर्दैवानं नसीन यांचा या उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवून एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली सूरजकुमार जयस्वालला अटक केली होती.
कोर्टातील सुनावणीत काय घडलं? कोर्टाचा निकाल?
साल 2012 मध्ये हा खटला बोरीवली दंडाधिकारी कोर्टापुढे सुनावणीसाठी उभा राहिला. आरोपी रिक्षाचालक सूरजकुमार जयस्वालनं त्याच्यावर लावलेले सारे आरोप नाकारले. तसेच खराब रस्ता हेच या अपघातामागचं एकमेव कारण असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. नसीन यांची मुलगी स्नेहल यांनीही आपल्या जबानीत तो रस्ता खराब होता हे मान्य केलं मात्र जयस्वाल हा रिक्षा वेगात चालवत होता हेदेखील कोर्टाला सांगितलं. पण तो नेमका किती वेगात होता?, हे मात्र त्या नीट सांगू शकल्या नाहीत. त्यामुळे खराब रस्त्यांवर अपघात हे चालकाच्या चुकीशिवायही घडू शकतात. त्यामुळे चालकाला त्या अपघातासाठी सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही. असं निरिक्षण नोंदवत न्यायाधीश ए.पी. खानोरकर यांनी आरोपी रिक्षाचालकाला दोषमुक्त केलं.