मुंबई : शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाबाबत तीन जून रोजी काढलेल्या परिपत्रकात सुधारणा केली आहे. आता ज्या आयसीएसई विद्यार्थ्यांना राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, अशा आयसीएसई विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना पहिल्या पाच विषयाचे गुण ग्राह्य जाणार आहेत.


आयसीएसई विद्यार्थ्यांच्या आयसीएसईच्या मार्कशीटवर जे सरासरी गुण देण्यात आले आहेत, त्या सहा विषयांपैकी पहिल्या पाच विषयाचे सरासरी गुण अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील, असे आदेश शिक्षण उपसंचालकाना देण्यात आले आहेत.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांची विषयांची संख्या तसेच गुण पद्धती राज्य मंडळांपेक्षा वेगळी आहे. या मंडळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राज्य मंडळांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतात, अशा विद्यार्थ्यांच्या गुणांसंदर्भात सरकारने हे परिपत्रक काढले आहे.

सरकारने  काढलेल्या आधीच्या म्हणजे तीन जूनच्या परिपत्रकात आयसीएसई मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही पाच (BEST OF FIVE) विषयाचे गुणप्रवेशाच्या वेळी ग्राह्य धरावे असे आदेश दिले होते.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने 'सीबीएसई' आणि 'आयसीएसई' या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा, मात्र त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच दिली होती.