मुंबई : "मी कोणालाही समर्थन देणार नाही हे लिहून देतो. तसंच शिवसेनेनेही लेखी स्वरुपात द्यावं, असं आव्हान  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलं आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 18 फेब्रुवारी म्हणजे आजच्या मुंबईतील सभेत, शिवसेना मंत्री राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे सोपवण्याची चिन्हं आहेत.

त्याबाबत शरद पवारांना विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "मी आताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लेखी स्वरुपात आम्ही (राष्ट्रवादी) समर्थन देणार नाही हे लिहून देतो. तसंच त्याची कॉपी राज्यपालांनाही देण्यास तयार आहे. पण शिवसेनेनेही असंच पत्र तयार करुन आमचं समर्थन नाही, हे लिहून राज्यपालांना द्यावं आणि त्याची कॉपी सर्क्युलेट करावं."

तसंच पारदर्शकतेच्या अजेंड्यावर बोलणारी भाजप जाहिरातीवर एवढा खर्च अशी करते? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. यासोबतच शिवसेना-भाजपच्या संघर्षात राष्ट्रवादीचाच फायदा होईल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त आहे.

दरम्यान, नोटाबंदीनंतर शेती क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचंही शरद पवार म्हणाले.