मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपमध्ये नसेन, असं धक्कादायक विधान राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात राणे बोलत होते.


आज रात्री नऊ वाजता हा कट्टा प्रसारित होणार आहे.

"महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या येण्याला शिवसेनेचा आक्षेप होता. माझा मंत्रिमंडळात समावेश झाला तर ते सत्तेतून बाहेर पडणार होते. त्यामुळे शिवसेना-भाजप युती होणार असेल तर माझ्या भाजपमध्ये राहण्याला अर्थ नाही," असं नारायण राणे म्हणाले.

"2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना हाच शत्रू पक्ष असेल. पण भाजप-शिवसेना युती झाल्यास माझी भूमिका स्पष्ट आहे, मी भाजप सोडणार. मी भाजपच्या मंत्रिमंडळात सहभागी झालो तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार होते. त्यामुळे युती झाल्यावर मी भाजपमध्ये नसेन," असं नारायण राणे म्हणाले.