मुंबई: 'पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेतीविषयक अभ्यास दौऱ्यासाठी मी विदेशात असल्याने व या विदेश दौऱ्याची माहिती पोलीसांना असल्याने मी फरार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.' अशी माहिती विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी चौकशीत आपण कायमच  सहकार्य करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

 

'ज्या डीसीसी बँकेच्या घोटाळ्यात आपले नाव घेतले जाते त्या बँकेचा मी कधीही संचालक नव्हतो. तर या बँकेकडून ज्या जगमित्र सुतगिरणीने कर्ज घेतले त्या संस्थेचा संचालक होतो व या संस्थेने कर्ज घेतले तेव्हा या संस्थेचा मी संचालकही नव्हतो.' असा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे.

 

'ज्या-ज्या वेळेस मला चौकशीसाठी बोलवण्यात आलं त्या-त्यावेळी मी तपासासाठी सहकार्य केलेले आहे. चार दिवसांपूर्वी तपासासंदर्भात एसआयटी समोरही हजर होऊन त्यांनाही आवश्यक असलेली माहिती स्वत:हून दिलेली आहे. तसेच विदेश दौऱ्याची एसआयटीला माहितीही दिलेली होती. या प्रकरणात आज चार्जशीट दाखल होणार हे माहित नव्हते तशी माहिती असती तर आपण दौरा रद्द केला असता.' अशीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

 

'परदेशातून परतताच कायदेशीर मार्गाने आपण या प्रकरणाला सामोरे जाऊ.' असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे.