झाकीर नाईक यांना टार्गेट केलं जात आहे. मात्र साध्वी प्रज्ञाबाबत गप्प का? ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती, राजनाथ सिंहांसोबत तीचे फोटो आहेत. मग याबाबत का बोलत नाहीत? असा सवाल अबू आझमी यांनी विचारला आहे.
दरम्यान, मुस्लीम धर्मगुरु डॉ. झाकीर नाईक आज भारतात परतणार नाही. डॉ. नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशननं याबाबतची माहिती दिली. अटकेच्या भीतीनं डॉ. झाकीर नाईकनं भारतात येणं तूर्तास टाळल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या ढाका शहरात दहशतवादी हल्ला झाला. या हल्लेखोरांमधला एक दहशतवादी डॉ. झाकीर नाईकच्या विचारानं प्रभावित झाला होता. याबाबत डॉ. झाकीर नाईकला विचारणा करण्यात आली.
त्यावर उत्तर देताना माझे चाहते जगभरात आहेत., असं झाकीर नाईकनं म्हटलं होतं. त्यामुळे नाईकवर दहशतवादी वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा आरोप होत आहे. त्याशिवाय मुस्लीम धर्म वगळता इतर धर्मांबद्दल नाईकने आक्षेपार्ह विधानं केल्याचाही आरोप आहे.
याशिवाय बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली आहे.