भिवंडी : भिवंडीत चार मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी आहेत. शांतीनगर पिराणीपाडा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. जखमींवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


इमारतीला शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तडे पडण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे रहिवाशांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीनंतर आपत्कालीन कक्ष,अग्निशामक दल जवानांसह शांतीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधील कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात येत असतानाच मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली.


या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 26 वर्षीय सिराज अहमद अन्सारी आणि 22 वर्षीय आखीब यांचा समावेश आहे. तर अब्दुल अजीज सय्यद मुलाणी, जावेद सलीम शेख, नरेंद्र बवाणे (उप स्थानक अधिकारी), देविदास वाघ (फायरमन) हे यामध्ये जखमी आहेत.



इमारत रिकामी करण्याचं काम सुरु असल्याने आपत्कालीन कक्षातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह सुमारे दहा ते पंधरा जणांवर इमारतीचा ढिगारा कोसळला. आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. चार ते पाच जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून अजुनही किमान पाच ते सहा नागरिक येथे अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे.


तुर्तास घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. घटनास्थळी मनपा आयुक्त, तहसीलदार, पोलीस उपायुक्त घटनास्थळी उपस्थित आहेत. सदरची इमारत फक्त सहा वर्ष जुनी आहे. मुन्नवर अन्सारी या बिल्डरने ती इमारत बांधली असून ती अनधिकृत इमारत असल्याची माहिती मनपा सूत्रांकडून मिळत आहे.