मुंबई : "मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घरच नाही. नाहीतर मलाही नोटीस आली असती," असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला. तसंच राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपने आज (11 जून) मुंबईतील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली.


काही महिन्यांपूर्वी अपक्ष आमदार रवी राणा तसंच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. मुंबईतील घरात परवानगीपेक्षा अतिरिक्त बांधकाम प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. रवी राणा आणि नारायण राणे यांना सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिप्पणी केली होती. त्यानंतरच ही नोटीस पाठवली होती. हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.   


राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस
"निवडणुकीच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी जोपर्यंत आहात तोपर्यंत राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड. मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घरच नाही. नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच द्यावी लागेल. नाहीतर मलाही नोटीस आली असती. पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपूरचं घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला ठिकाणी नोटीस आली नाही. ही योग्य पद्धत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


मुख्यमंत्री आणि सरकारने अंतर्मुख व्हावं; फडणवीसांचा सल्ला
या पराभवानंतर आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने अंतर्मुख व्हायला हवं असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. राज्यातील विकास थांबला आहे. आमच्या काळातले सर्व प्रकल्प थांबवून राज्याचं अतोनात नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.  विमा कंपन्यांना मोठा फायदा होत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. किमान दोन कामे राज्य सरकारने दाखवावी असे आव्हानही फडणवीस यांनी दिले. 


आता विधान परिषदेवर लक्ष
फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्‌बुद्धि जागृत असेल असा दावा त्यांनी केला.