Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, त्याना जे करायचं असतं ते करतात, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 'माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला' ही शरद पवारांची प्रतिक्रिया बोलकी असल्याचेही ते म्हणाले. फडणवीस यांनी विजयाचे श्रेय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना दिले, आमचे देवेंद्र फडणवीस तसेच असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊतांपेक्षाही धनंजय महाडिकांना जास्त मते मिळाली, देवेद्र फडणवीस यांनी तशी मनाला गाठच बांधली होती. यापेक्षा दुसरी कोणती नामुष्की आहे अशी विचारणा करत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास हेच भाजपचे गणित असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते जास्त बोलघेवडे झाले आहेत
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही हल्ला चढवला. महाविकास आघाडीचे नेते जास्त बोल घेवडे झाले आहेत, देवेंद्र फडणवीस मोजेकच आणि थोडेच बोलतात त्यांनी मारलेल्या सिक्सने महाविकास आघाडी गारद झाल्याचे पाटील म्हणाले. राऊतांनी महाविकास आघाडीकडून काल झालेल्या टीकेलाही उत्तर दिले. घटना मानता, तर ईडी, सीबीआय, सर्वोच्च न्यायालय हे त्याच राज्यघटनेतून आल्याचे ते म्हणाले. तुम्ही राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करत आहात त्यावर पहिल्यांदा बोला, असा टोलाही त्यांनी लगावला.
आपल्यावर होत असलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. लोक चांगल्या आंब्याच्या झाडाला दगड मारतात त्या प्रमाणे चांगल्या माणसाला चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न आहे, पण मी पाटील आहे पाटील, पश्चिम महाराष्ट्रात तुमची फळी कापून काढल्याचे ते म्हणाले.