Monsoon News: शुक्रवारी तळकोकणात दाखल झालेला मान्सून आज (11 जून) अखेर मुंबईतही दाखल झाला आहे. आज डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
दरम्यान, मुंबईच्या हवामान विभागानं देखील मान्सूनच्या आगमनासंदर्भात माहिती दिली आहे. मान्सून आज (11 जून 2022) मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात दाखल झाला आहे. मान्मन मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढे सरकला असल्याची माहिती मुंबईच्या हवामान विभागानं दिली आहे.
आज राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुण्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पोलिसांचीही तारांबळ उडाली. पावसात पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळं आयुक्तालयात 20 हून अधिक वाहने अडकली होती. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृगनक्षत्राचा मुहूर्त चुकवल्यानंतर मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणारा बळीराजा त्यामुळे सुखावला आहे. आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस लखलखाट तसेच गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र काल झालेल्या पहिल्या मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे तळवडेत दुकानात पाणी शिरले. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.