डोंबिवली : डोंबिवलीजवळच्या खोणी गावात स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ही कारवाई केली आहे.


खोणी गाव परिसरात दोन इसम स्फोटकांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरुन आलेल्या दोघांना ताब्यात घेतलं.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला. ज्यात तब्बल 199 जिलेटीनच्या कांड्या आणि 100 डिटोनेटर्सचा समावेश होता.

ही स्फोटकं बाळगण्याचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नसल्याने हा साठा जप्त करत पोलिसांनी या दोघांना अटक केली. अशोक ताम्हणे आणि मारुती धुळे अशी या दोघांची नावं असून ते रायगड जिल्ह्यातल्या कर्जतचे राहणारे आहेत.

हा साठा त्यांनी नेमका कशासाठी आणला होता? आणि या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांशी संबंध आहे का? याचा तपास सध्या क्राईम ब्रँचच्या वतीने सुरु आहे.