मुंबई: उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी देशभरात खळबळ उडाली आहे. अनेकजण रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवत आहेत, तसंच दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.


याबाबत आता महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही आवाज उठवला आहे. कठुआ बलात्काराच्या घटनेने चिडलेल्या आनंद महिंद्रा यांनी आपला राग ट्विटरवर व्यक्त केला आहे.

बलात्काऱ्यांना फाशी देण्यासाठी मी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

आनंद महिंद्रा म्हणाले, “जल्लादची नोकरी कोणालाही हवी हवीशी वाटत नाही. मात्र जर बलात्कारी आणि लहान मुलींना ठार मारणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल, तर मी ही नोकरी आनंदाने स्वीकारेन. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र आपल्या देशातील अशा घटनांमळे माझं रक्त खवळतं.”


देशभरात निदर्शने

दरम्यान, कठुआ, उन्नाव बलात्कारप्रकरणी देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. काल मुंबईसह पुणे, औरंगाबादमध्ये निषेध नोंदवण्यात आला.

तिकडे दिल्लीतही निषेध सभा सुरु आहेत. शिवाय विविध विद्यापीठं, शैक्षणिक संस्थांमध्येही या घटनेच्या निषेधार्थ प्रदर्शन करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या

आणि फाशीचा खटका ओढला... तेंडुलकरांनी पाहिलेली फाशी... त्यांच्याच शब्दांत