मुंबई : मुंबई शहरात राहणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीने उद्या शुक्रवारी (17 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. ह्यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. ह्या विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.


कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र उद्या शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 ह्या वेळेत राबवले जाणार आहे.


मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील ह्या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने, उद्या साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.


मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
मुंबईत गणेशोत्सवाचे आफ्टर इफेक्ट दिसू लागले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. परवाच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या 147 ने वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 514 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 604 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4602 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1277 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 37 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.