ठाणे : परदेशातील धर्तीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि ठाणे महापालिका खाडीत तरंगते हॉटेल सुरू करीत आहे. सी क्रूझ नावाच्या या हॉटेलमध्ये बोटीवरील मेजवानी पर्यटकांना ठाण्यात अनुभवता येणार आहे. ठाण्यात घोडबंदर रोड वरील गायमुख चौपाटीवर हे हॉटेल सोमवारपासून सुरू होणार आहे. सद्या कोरोना निर्बंधामुळे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.


यात ओपन डेक आणि एसी लोंज आहेत. एकूण 100 नागरिक एका वेळी यामध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. या हॉटेलमध्ये सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता तरंगते हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे. ही संकल्पना मुंबईमध्ये अंमलात आणली होती. मात्र, लॉकडाऊन आणि निर्बंधामध्ये या तरंगत्या हॉटेलची सफर बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना देखील आता ठाण्यात यावे लागेल. या हॉटेलमध्ये जागा बुक करण्यासाठी 200 रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील.


गायमुख येथे या तरंगत्या हॉटेलमधून एकबाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असा नयनरम्य नजारा आहे. आधीच इथे ठणेकरांची गर्दी असते. त्यात हे नवीन आकर्षण आता सुरू होत आहे. द.सी.फ्लोटिंग रेस्टोरेंट या खासगी कंपनीने हे हॉटेल सुरू केले असून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने ही संकल्पना मांडली आहे. एकीकडे चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट प्रकल्प हाती असतानाच ठाण्यातील गायमुख खाडीत तरंगणारे हॉटेल ठाणेकरांना आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. 


या हॉटेलला महाराष्ट्र मेरिटाईन बोर्डने परवानगी दिली असून या जहाजमध्ये सद्या तरी 100 पर्यटक बसू शकतात. ठाण्यात प्रथमच खाडीकिनारी फ्लोटिंग रेस्टोरेन्ट अशी नवीन संकल्पना अमलात येत आहे. तसेच यामध्ये पर्यकटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली असून लाईफ गार्ड, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही केमेरे तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.