अंबरनाथ : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने एकीकडे कोरोना हॉस्पिटल्स उभारले जात असतानाच दुसरीकडे कोरोना संशयित रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल आणि अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलच्या अशाच गलथान कारभारामुळे अनेक रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे.


एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागल्यावर त्याची कोरोना चाचणी केली जाते. मात्र त्याचे रिपोर्ट यायला किमान दोन ते तीन दिवस लागतात. या मधल्या काळात त्याची प्रकृती खालावली, तर त्याच्याकडे रिपोर्ट नसल्याने त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि कोरोनाची लक्षणं असल्याने इतर हॉस्पिटलही त्याला दाखल करुन घेत नाहीत, असा प्रकार अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये घडला आहे.


रविवारी (7 जून) रात्री अंबरनाथच्या कैलास नगर भागात राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला असाच त्रास होऊ लागल्याने त्याने अंबरनाथचं एक खासगी रुग्णालय गाठलं, मात्र तिथून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथेही पुरेशा यंत्रणा नसल्याने त्याला पुन्हा खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला, मात्र या सगळ्यात या रुग्णाचा मृत्यू झाला.


शनिवारीही (6 जून) अशाचप्रकारे रिपोर्टच्या प्रतीक्षेत असलेल्या एका रुग्णाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याने अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र तिथे नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकत त्याला पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर संबंधित रुग्णाने उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल गाठलं, तिथे दाखल करुन न घेतल्याने त्याने पुन्हा छाया हॉस्पिटल गाठलं. तिथून त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जायला सांगण्यात आलं. मात्र यावेळी साधी रुग्णवाहिकाही छाया हॉस्पिटलने न दिल्यामुळे या रुग्णाने परिवारासोबत रिक्षाने कळवा गाठलं. तिथून रात्री उशिरा त्याला रुग्णवाहिकेने मुंबईच्या नायर हॉस्पिटलला पाठवून दाखल करुन घेण्यात आलं.


या सगळ्या प्रकारानंतर अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शहरात रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही जीवाचं रान करत असताना आरोग्य यंत्रणा अशाप्रकारे जबाबदारी झटकण्याचं काम करत असेल, तर या रुग्णालयाच्या अधीक्षकांची बदली करावी, अशी लेखी मागणी आपण ठाणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य उपसंचालक यांच्याकडे केल्याची माहिती अंबरनाथ महापालिकेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.