मुंबई : आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचं नाव घेतलं की साधारणत: रामदेव बाबांच्या 'पतंजली'ची आठवण येते. मात्र, पतंजलीला टक्कर देण्यासाठी आता 'हिंदुस्तान युनिलिव्हर' मैदानात उतरत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर या मल्टिनॅशनल कंपनीने एफएमसीजी बाजारात आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सची विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


पतंजली.... नाव कानावर पडल्यावरच रामदेव बाबा डोळ्यसमोर येतात. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पतंजलीने आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टूथपेस्टपासून खाण्याच्या बिस्किटांपर्यंत ते अगदी साबण ते नूडल्सपर्यंत सर्वल प्रॉडक्ट बाजारात आणणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्याही पतंजलीचे प्रॉडक्ट बऱ्यापैकी पसंतीस उतरले आहेत.

रामदेव बाबा यांची लोकप्रियतेचा फायदाही पतंजलीला नेहमीच होतो. पतंजलीने भारतीय बाजारात आपले पाय रोवले असून, त्यांना टक्कर देण्याचं मोठं आव्हान हिंदुस्तान युनिलिव्हर समोर असेल. तज्ज्ञांच्या मते आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सची उलाढाल 5 हजार कोटींवर आहे. त्यामुळे एवढ्या अवाढव्या बाजारात नवी कंपनी येत असेल, तर नक्कीच त्याकडे पतंजलीलाही दुर्लक्ष करुन चालणार नाही.

हिंदुस्तान युनिलिव्हर दक्षिण भारतातून बाजारत आगमन करणार आहे. केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांकडे हिंदुस्तान युनिलिव्हरचं सध्या सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. टूथपेस्टसह अनेक प्रॉडक्ट्स आयुर्वेदिक असणार आहेत. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हरचं कन्झ्युमर मार्केट पतंजलीपेक्षाही मोठं आहे. शिवाय, आधुनिक मार्केटिंग सिस्टिम असल्याने हिंदुस्तान युनिलिव्हर पतंजलीला जोरदार टक्कर देणार असल्याचे दिसून येते आहे.

पतंजली कपंनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या तुलनेत अत्यंत लहान कंपनी आहे. मात्र, रामदेव बाबा यांची लोकप्रियता आणि त्यांचे राष्ट्रवादी विचार यांमुळे पतंजलीला वेगळी पसंती मिळते. आता येत्या काळात कळेलच की, हिंदुस्तान युनिलिव्हर सरस ठरते की रामदेव बाबांची पतंजली.