मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ओमकार ग्रुपचे बाबुलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. ईडीनं 22 हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या दोघांना अटक केली आहे. मुंबईतील मोठ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांशी संबंधित विकासक समुहांमध्ये ओमकार समुहाचा समावेश आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकांवर सुनावणी पार पडली.


मुंबईतील बिल्डरही आता ईडीच्या रडारवर आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह आसपासच्या भागांत बड्या बिल्डर्सवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. विकासक आणि राजकीय नेते यांचं नेहमीच सौख्य राहिलंय. त्यामुळे बिल्डरांच्या माध्यमातून ईडी काही राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईत जे. पी. इन्फ्रास्ट्रक्चरवर रेड टाकून ईडीनं काही कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केलं होतं. आपला पैसा गुंतवण्यासाठी बांधकाम क्षेत्र हे सर्वात उपयुक्त क्षेत्र मानलं जातं. त्यात नफा दहा पटीनं होतो आणि आपलं नावंही समोर येत नाही. शिवाय नुकसान होण्याची शक्यता ही खूप कमी असते. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैश्यांची उलाढाल होत असते.


काय आहे प्रकरण?


झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर 22 हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीने आपला तपास सुरु केला असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. ओमकार समूहाने विविध बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले आहे. तर येस बँकेकडून 450 कोटींचे कर्ज घेतलं आहे. हे पैसे इतरत्र वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 410 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुराणा ग्रुपच्या औरंगाबाद येथील ओमकार समुहावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीनं ओमकार समूहाच्या दहा जागांवर धाड टाकत चौकशी केली होती. या प्रकरणात कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना अटक झाली. इतकंच नाही तर 22 हजार कोटींच्या प्रकरणी सुद्धा ओमकार ग्रुपच्या अडचणी वाढू शकतात. कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल असून कोर्टाने याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत आणि याचाही तपास ईडीने सुरु केला आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :