मुंबई : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना दयामाया नाही. अशा दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण अशा व्यक्ती या सुसंस्कृत समाजासाठी धोकादायक असतात. या शब्दांत आपलं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं एका आरोपीनं पोक्सो अंतर्गत नोंदवलेल्या बलात्काराच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेविरोधात दाखल केलेलं अपील फेटाळून लावलं. मोबाईल मध्ये गाणी दाखवण्याच्या बहाण्याने एका 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या 29 वर्षाच्या नराधमाला कोणताही दिलासा देण्यास न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच नकार दिला आहे.


एप्रिल 2015 मध्ये ठाणे जिल्ह्यात हे प्रकरण घडलं होतं. पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या या आरोपीने एका 5 वर्षीय लहान मुलीला मोबाईलमध्ये गाणी दाखवण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना शेजाऱ्यांना कळताच शेजारच्यांनी आरोपीच्या घरी धाव घेत त्याच्या तावडीतून या मुलीची सुटका केली. घडलेला प्रसंग मुलीच्या घरच्यांना कळताच पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक केली. या गंभीर कृत्याची दखल घेत ठाणे सत्र न्यायालयाने जून 2018 मध्ये आरोपीला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

या शिक्षेविरोधात आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर या अपीलवर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा अशा व्यक्ती समाजासाठी घातक असतात आणि म्हणूनच यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हे असं हे एक प्रकरण आहे, ज्यामध्ये याचिकाकर्त्याता सुधारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आरोपीचे वय पाहता त्यानं केलेल्या कृत्याचे दुष्परिणाम त्याला पूर्णपणे ठाऊक होते. त्यामुळे अशी विकृत माणसं सुसंस्कृत समाजासाठी धोकादायक असतात. असं स्पष्ट करत हायकोर्टानं दोषीला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याचा अर्ज फेटाळून लावला.