मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आणि गेल्यावर्षी याच कालावधीत त्यांच्या बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) आणि एसडीआर (सबस्क्राबर डेटा रेकॉर्ड) डीलिट करू नका असे निर्देश असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. पोलिसांमार्फत संबंधित मोबाईल सेवा देणा-या कंपनीला हे आदेश दिले जातील. त्यामुळे आता आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. 


गेल्यावर्षी महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. कासारवडवली येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव अनंत करमुसे असं आहे. वर्तक नगर पोलीस स्थानकांत यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी करत करमुसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 


यासंदर्भात न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की आव्हाड आणि संबंधित पोलीस कर्मचा-यांचा 'सीडीआर' आणि 'एसडीआर' हा यातील महत्त्वाचा पुरावा आहे. साधारणत: हा डेटा वर्षभर कंपनीकडनं जतन केला जातो. हा कालावधी येत्या रविवारी पूर्ण होतोय, त्यामुळे जर निर्देश दिले नाहीत तर हा डेटा कंपनी डिलिट करेल. याबाबत हायकोर्टानं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला माहिती दिली की, त्यांना याविषयी माहिती नाही. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल करत संबंधित आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलेलं आहे. याची दखल घेत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करत हा डेटा पुढील निर्देश येईपर्यंत डिलिट न करण्याचे निर्देश मोबाईल कंपनीला दिले आहेत.


पुन्हा लॉकडाऊन झाल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे  लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी- पृथ्वीराज चव्हाण  


काय आहे प्रकरण -


अनंत करमुसे यांनी समाज माध्यमांवर केलेल्या काही पोस्टचा राग आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी आव्हाड हे समोर उभे होते असेही या तरुणाचे म्हणणे आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असं सांगत उलट या तरुणावर दाभोळकर-पानसरे यांच्या हत्येत या तरुणाचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.


लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांनी कोरोनाशी लढणा-यांच्या सन्मानार्थ सर्व भारतीयांना एका रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याचा सर्वात पहिला विरोध हा जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र देशवासियांनी भरभरून पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा दिल्याचे बघितल्यानंतर अनंत करमुसे या ठाण्यातील कासारवडवलीत राहणार्‍या तरुणाने सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. 


दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का?, असा सवाल यातनं विचारण्यात आला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचे एक अश्लील चित्र देखील या तरूणाने पोस्ट केले होते. यानंतर या तरुणाच्या आरोपानुसार त्यारात्री दोन पोलीस त्याच्या घरी आले. पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे सांगत ते गाडीत बसवून आपल्याला थेट जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील 'नाद' बंगल्यावर घेऊन आले. हे पोलीस गणवेशात होते तसेच त्यांच्याकडे रिव्हॉल्वर देखील होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आल्यानंतर त्याला सर्वप्रथम फायबर, लाकूड आणि लोखंडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी त्याला काही प्रश्न विचारले. तरुणाच्या म्हणण्यानुसार प्रचंड मारहाण झालेली असताना त्याने आव्हाड यांची माफी मागत ती पोस्ट डीलीटही केली. मात्र तरीही पुन्हा आव्हाड यांच्यासमोर त्याला मारहाण करून वर्तकनगर पोलीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तरुणाची अवस्था बघून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची तपासणी केली. यामध्ये त्याला जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणाने अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मारहाणीचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील या तरुणाच्या विरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.