मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 31 तारखेला रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, त्यांचं दुखणं वाढल्यामुळं निर्धारित वेळेआधीच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटात दुखू लागल्यामुळं रविवारी ते रुग्णालयाच गेले होते. जिथं तपासणीनंतर त्यांना 31 मार्चला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता. शरद पवार यांच्यावर 31 मार्च म्हणजेच बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं कळत आहे.


शरद पवार साहेबांना उद्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात येणार होते मात्र आजच पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढच्या तपासण्या व औषधोपचार इथेच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.








राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही स्टेटसच्या माध्यमातून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. बाबांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं लिहित, त्यांच्या प्रकृतीबाबतची दैनंदिन माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक देतील असंही त्यांनी स्टेटसच्या माध्यमातून सांगितलं. 


दरम्यान, ब्रीच कँडीमध्ये शरद पवारांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. 


शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना


शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात असल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, श्री शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.