Vasai Fire News : देशासह राज्यभरात दिवाळी (Diwali 2022) उत्साहात साजरी केली जात आहे. तब्बल दोन वर्षांनी देशात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. अशातच वसईत (Vasai News) मात्र दिवाळीच्या उत्साहात विरझण पडलं आहे. वसईत काल सोमवारी तब्बल सहा ठिकाणी (Vasai Fire News) आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. काल दिवसभरात वसई, विरार आणि नायगावमध्ये आगीच्या सहा घटना घडल्या आहेत. घरातील ए.सी. जळल्यानं एका बंगल्याचं नुकसान झालं तर फटाक्यामुळे पाच ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यात सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 


कुठेकुठे लागली आग? 


1. वसई पश्चिमच्या अंबाडी रोड येथील सत्यम बंगल्यात राहणाऱ्या शाह कुटुंबियांच्या घरातील वाताणुकूलीन यंञाणे अचानक पेट घेतला. माञ फटाक्यांची दुकाने आणि अग्निशमन केंद्राच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवलं आहे. आगीची घटना घरातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. येथील बंगला आणि त्याशेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये मागील तीन महिन्यांपासून विजेचा प्रॉब्लेम सुरु आहे. बिल्डींगच्या आणि बंगल्याच्या रहिवाशांनी याबाबत महावितरणाला तक्रारी दिल्या होत्या. मात्र त्याकडे महावितरण विभागानं कानाडोळा केला. येथील घरांच्या एसी, फ्रिज इत्यादी जास्त वीज लागणारी विद्युत उपकरणं व्यवस्थित चालत नव्हती, कित्येकांच्या घरातील विद्युत उपकरणंही बिघडली. मात्र महावितरणानं वेळीच लक्ष न दिल्यानं एसीला आग लागल्याचा घरच्यांचा आरोप आहे. या आगीत शाह कुटुंबियांच्या घराचं नुकसान झालं असलं. तरी सुदैवानं ऐन दिवाळीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  


2. एकट्या विरारमध्ये सोमवारी फटाक्यांच्या ठिणगीमुळे तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथे कापसाच्या गाळ्याला फटाक्याची ठिणगी लागून आग लागली होती. गोदामातील संपूर्ण कापूस जळून खाक झाला. वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग नियंत्रणात आणली होती.


3.  विरार पूर्वेच्या मोहक सिटी येथे इमारतीच्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या स्टोरेजला रॉकेटची ठिणगी पडून आग लागली होती. येथे ही वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहचून आग नियंत्रणात आणली होती.


4.  विरार पश्चिमेच्या नवापूर येथे ही रॉकेटच्या ठिणगीमुळे एका नारळाच्या झाडाला आग लागली होती. तिथेही वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणात आणली होती.


5.  ववसई पूर्वेकडील वसई फाटा येथील एका चप्पल गोदामाला भीषण आग लागली होती. रात्री 10.30 च्या सुमारास ही आग लागली होती. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाकडून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, 7 टॅंकर, 2 अधिकारी आणि 16  अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्यानं ही आग विझवण्यात आली. आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र सामानांच अतोनात नुकसान झालं आहे.


6.  नायगांवच्या टिवरी येथे नक्षत्र प्रिमायसेस या टॅावरमधील 11 व्या मजल्यावर एका घराला रॅाकेटमुळे आग लागली होती. रात्री 10.30 च्या सुमारास ही आग लागलेली. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्वरीत आग विझवण्यात आली. मात्र घराच थोडं नुकसान झालं. 


त्यामुळे आपण जर फटाके फोडत असालं, तर आपल्या आनंदामुळे कुणाच तरी नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.