नवी मुंबई : दिघ्यातील सिडकोच्या जमिनीवर असलेल्या चार इमारतींना जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. दिघा परिसरातील अमृतधाम, अवधूत छाया, दत्तकृपा आणि दुर्गामाता प्लाझा या इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहेत. या इमारतींमधील घरे खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आल्यामुळे रहिवाशांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

हायकोर्टाने दिघ्यातील सिडको आणि एमआयडीसीच्या भूखंडावरील 99 बेकायदेशीर इमारती पाडण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनाला दिले आहेत. या कारवाईविरोधात दिघ्यातील रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण हा विषय शासनाचा असून याबद्दलचा निर्णयही शासनाने घ्यावा, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं.

महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2015 पर्यंतची घरे अधिकृत करण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान घेतला होता. पण उच्च न्यायालयाने अजून या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलेला नाही.