राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना ईडी कोर्टाकडून याआधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याविरोधात राज्य सीआयडीने दाखल केलेलं प्रकरण प्रलंबित असल्याने कदम जेलमध्येच होते. त्यासाठी यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत.
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक झाली. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं. डिसेंबर 2018 मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचं संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने रमेश कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र या प्रकरणी पोलीस तपासात जाणूनबुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप कदमांच्यावतीने करण्यात आला.
VIDEO | काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळाचा महाघोटाळा?
दरम्याच्या काळात अनेक कारणाने रमेश कदम सतत चर्चेत राहिले. एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं, त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मात्र पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना मंजुळा शेट्ये प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. याशिवाय पोलीस बंदोबस्तात विधानभवनात आलेल्या कदमांनी जाहीरपणे भाजपला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं होतं.
संबंधित बातम्या