मुंबई : क्रिकेट पाहताना चौकार आणि षटकार ठोकले किंवा विकेट गेली तर प्रेक्षक गोंगाट करणारच, त्यांना खेळाचा आनंद घेऊ द्या, असे सुनावत आयपीएल सामन्यात ध्वनी प्रदूषण झाल्याची तक्रार करणारी याचिका हायकोर्टानं सोमवारी फेटाळून लावली.
विशेष म्हणजे याचिकाकर्ते के. सोनी यांचे निवासस्थान पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये आहे, याची दखलही खंडपीठाने घेतली. जर तुम्ही उपनगरामध्ये राहता तर तुम्हाला शहरामध्ये झालेल्या सामन्याचा कसा काय त्रास झाला?, असा सवालही खंडपीठाने केला.
ज्या परिसरात सामने झाले तिथून कोणी तक्रार केली नाही आणि त्यापासून दूर दहिसरमध्ये याचा कसा काय त्रास झाला? असे खंडपीठाने विचारले. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयविरोधात कठोर दंडात्मक कारवाईची मागणी याचिकादाराने केली होती.
सहा वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याचे सर्व नियम धुडकावण्यात आले, असा आरोप करत मुंबईतील एका नागरिकानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करुन गोंगाट केला आणि त्यामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास झाला, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.
मात्र मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा दावा सपशेल फेटाळून लावला. खेळामध्ये आवाज होणारच, उत्कंठावर्धक सामन्यात प्रेक्षक मोठ्या आवाजात खेळाडूंना चिअर आणि आरडाओरड करणारच. लोकांनादेखील खेळाचा आनंद घेऊ द्यायला हवा. दिवसभराच्या धकाधकीतून विरंगुळा मिळवण्यासाठीच लोकं स्टेडियमध्ये मजा करतात, तेव्हा त्यांना मजा करु द्या, असे मुख्य न्यायमूर्तींनी याचिकादाराला सुनावले.
आयपीएलमधील ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
15 Jul 2019 09:47 PM (IST)
ज्या परिसरात सामने झाले तिथून कोणी तक्रार केली नाही आणि त्यापासून दूर दहिसरमध्ये याचा कसा काय त्रास झाला? असे खंडपीठाने विचारले. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयविरोधात कठोर दंडात्मक कारवाईची मागणी याचिकादाराने केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -