मुंबई: शिवसेना आणि काँग्रेसची छुपी युती आहे, असा आरोप भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही केला आहे.

शिवसेना आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये साटंलोटं असल्याचा दावा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

काँग्रेस आणि शिवसेनेनं मुंबईसाठी नाही तर जिल्हा परिषदेसाठी युती केली. रायगडमध्ये शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी काँग्रेससोबत आघाडी केली आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसपुढे लाचार झालीय का? असा सवाल तटकरेंनी विचारला.

काँग्रेस आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणत असेल, तर मग काँग्रेस ही शिवसेनेची "सी" टीम आहे का, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं तटकरे म्हणाले.

आशिष शेलार यांचा आरोप

यापूर्वी भाजप आमदार आशिष शेलार यांनीही मुंबईत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये छुपी युती असल्याचा आरोप केला आहे. जिथे शिवसेनेचे उमेदवार कमी पडतील तिथे काँग्रेसने मदत करायची आणि काँग्रेसला शिवसेनेने मदत करायची अशी छुपी युती असल्याचा दावा, शेलार यांनी केला होता.

अनिल परब यांचं आव्हान

दरम्यान, शिवसेना नेते अनिल परब यांनी आशिष शेलार यांना शिवसेना-काँग्रेसमधील छुपी युती सिद्ध करण्याचं  आव्हान दिलं आहे. हे सिद्ध करा अन्यथा माफी मागा, असं परब म्हणाले.

अशिष शेलार यांना खुलं आव्हान देतो, ज्या 42 वॉर्डमध्ये मॅच फिक्सिंग झालीय ते कुठले दाखवून द्या, खुल्या व्यासपीठावर येऊन वॉर्डनिहाय उत्तरं देतो, असं परब म्हणाले.