मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या कोस्टल रोडचा आराखडा मुंबई पुरातन वारसा संवर्धन समितीने फेटाळला आहे. प्रस्तावित आराखडा समुद्रकिनाऱ्यावरच्या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या सौंदर्यात बाधा आणणारा असल्याची समितीची तक्रार आहे.

मरीन ड्राईव्हपासून सुरु होणाऱ्या कोस्टल रोडमुळे क्वीन्स नेकलसचं सौंदर्य कमी होईल, असं समितीचं म्हणणं आहे. त्याचसोबत बांद्रा फोर्टसमोर पर्यटकांसाठी मोठा डेक उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यामुळे फोर्टच्या सौंदर्याला हानी पोहोचू शकते असा समितीचा दावा आहे.

यामुळे मुंबई महापालिकेला पुन्हा नव्याने कोस्टल रोडचा आराखडा बनवावा लागणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कसा असेल कोस्टल रोड?

नरिमन पॉईंट येथील आमदार निवासापासून सुरू होणारा हा 35 ते 36 किलोमीटरचा किनारपट्टीला लागून असलेला रस्ता कांदिवलीत जाऊन मिळणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे शहरातील 18 ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.

खार ते वर्सोव्यापर्यंत भुयारी रस्ता तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. सागरी सेतूमुळे किनारपट्टीवरील लोकांना सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यास कोणताही अडथळा येणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. म्हणून समुद्रकिनारी लागून 40 ते 60 फुटाचा भाग हा लोकांना फिरण्यासाठी विकसित केला जाणार आहे.

सागरी सेतूपेक्षा हा प्रकल्प कमी पैशात होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या

‘आमचे श्रेय आम्ही नक्कीच घेऊ’, सामनातून भाजपला टोला 


कोस्टल रोड सेनेचा की भाजपचा? आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे श्रेयवादाची लढाई 


मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राची मंजुरी, उद्धव यांचं स्वप्न भाजपकडून हायजॅक?


मुंबईतला कोस्टल रोड दोन वर्षात पूर्ण करू : मुख्यमंत्री