मुंबई: येत्या २४ तासात कॉमेडियन कपिल शर्मानं लाचखोर अधिकाऱ्यांचं नाव उघड करावं, अन्यथा त्याच्या घराबाहेर आंदोलन छेडू, असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिला आहे.

मुंबईत कार्यालय उभारण्यासाठी महापालिकेतल्या एका अधिकाऱ्यांनं ५ लाखांची लाच मागितली असा आरोप काल ट्विटरद्वारे कपिल शर्मानं  केला.

मात्र, नंतर ज्या वर्सोव्यात  कपिल शर्मानं कार्यालय उभारलंय, तेच मुळात अनधिकृत असल्याचं समोर आलं..

कपिलनं वर्सोव्यात एका मजल्याऐवजी अनधिकृतपणे तीन मजले उभारले आहेत. त्यासाठी खारफुटीचं जंगलही तोडल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने तसंच मनसेनेही केला आहे.



काय आहे प्रकरण ?

कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्वीट करुन महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या मंजुरीसाठी 5 लाख मागितल्याचा आरोप केला. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 15 कोटींचा टॅक्स भरल्याची आठवणही त्याने करुन दिली. शिवाय ‘हेच का अच्छे दिन?’ असा खोचक सवालही विचारला. पण ट्वीटला काही तास उलटण्याच्या आधीच कपिलचं हे ट्विटरास्त्र त्याच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
ज्या बांधकामासाठी लाच मागितली गेली, ते वर्सोव्यातील ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे. वर्सोव्याच्या ज्या भागात हे ऑफिस थाटलं जातंय, तो भाग, रहिवाशी बांधकामासाठी राखीव आहे. पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरु असल्याचा आरोप आहे.

 

कपिलच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनंही लाचखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्मानं उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे.

संबंधित बातम्या :

लाचखोरीत मध्यस्थीचा पुरावा द्या अन्यथा…, कपिलला मनसेचा इशारा

कपिल शर्माचं ऑफिसच वादात, ते ट्विट कपिलवरच उलटणार?

कपिल भाई, लाचखोराचं नाव सांग, त्याला सोडणार नाही : मुख्यमंत्री

कपिलचा मुखवटा घालून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बीएमसीने 5 लाखांची लाच मागितली : कपिल शर्मा