मुंबई : मला प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानांवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला त्यांना किंवा त्यांच्या विधानांना महत्त्वही द्यावंसं वाटत नाही. मी फक्त हेमंत करकरे यांच्याबद्दलच बोलू इच्छिते. ते रोल मॉडेल होते आणि त्यांचं नाव अभिमानानंच घेतलं पाहिजे, असं मत मुंबई हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्या कन्या जुई करकरे-नवरे यांनी व्यक्त केलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत जुई नवरे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. मी सोशल मीडियावर प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानांबाबत वाचली. त्यात माझ्या पपांचं नाव आलं म्हणून मी ते अधिक उत्सुकतेनं वाचलं. त्यात पपांचं नाव नसतं, तर कदाचित मी ते वाचलंही नसतं. त्यावरच्या विविध पातळ्यांवरून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियाही वाचनात आल्या. मला वाटतं, एकट्या हेमंत करकरेंचा नाही तर सर्वच शहीदांचा मान ठेवला गेलाच पाहिजे, असेही जुई यांनी म्हटलं आहे.
मुंबई हल्ल्याच्या वेळी पप्पा कोणतीही पूर्वतयारी न करता, काळजी न घेता गेले होते, असं तेव्हा काही लोक बोलत होते, पण मला ते पटत नाही, असंही त्या म्हणाल्या. त्यांच्यासारखा माणूस असं वागू शकत नाही. पप्पा आणि पोलीस नियंत्रण कक्षात झालेल्या संभाषणाचं ध्वनिमुद्रण माझ्याकडेही आहे. पप्पांनी त्या वेळी कामा रुग्णालयाभोवती वाढीव कुमक तातडीने मागवली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.
मला नेहमीच आश्चर्य वाटतं की, त्यांचा अखेरचा आदेश का पाळला गेला नाही? काय कारण होतं त्यामागे? मी आजही ती ध्वनिफीत ऐकते. माझ्या पप्पांचा अखेरचा आवाज ऐकते. त्यांची अधिक कुमक पाठविण्याची विनंती ऐकते. लष्कराला पाचारण करा, असंही ते सांगताना ऐकते, असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
मालेगाव प्रकरणाच्या काळात त्यांच्याशी दोन मिनिटं बोलता येईल एवढीही त्यांना फुरसत नव्हती. ते इतके त्या प्रकरणात बुडाले होते. माझ्या आईला त्या प्रकरणाची आणि त्यातून ओढवणाऱ्या परिणामांची चिंता वाटायची, असेही जुईंनी म्हटले आहे.
माझ्या पालकांविना मुंबई शहर पूर्वीचं वाटतच नव्हतं. जुन्या आठवणी सतत समोर उभ्या राहात होत्या. केवळ माझ्या मुलांमुळे मी त्या धक्क्यातून सावरले. त्यांच्यामुळेच मी सकारात्मकतेनं काम करू शकले, असं त्या म्हणाल्या. माझ्या घरी पपांनी त्यांच्या हातानं बनवलेली काही लाकडी शिल्पं आहेत. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून पोलीस पदक स्वीकारतानाचा त्यांचा एक फोटो माझ्या घरातील दिवाणखान्यात आहे. माझ्या मुलींना त्यांचा हा वारसा समजावा, अशी माझी इच्छा आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
प्रज्ञा ठाकूर यांच्यासह त्यांच्या विधानांना महत्त्वही द्यावंसं वाटत नाही, हेमंत करकरेंच्या मुलीचं मत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2019 01:42 PM (IST)
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून पोलीस पदक स्वीकारतानाचा त्यांचा एक फोटो माझ्या घरातील दिवाणखान्यात आहे. माझ्या मुलींना त्यांचा हा वारसा समजावा, अशी माझी इच्छा आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -