मुंबई : मतदार केंद्रावर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. फक्त मोबाईलच नव्हे तर कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर नेऊ नये अशी सक्त ताकीद निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.  दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईलनं शुटिंग करून गुप्त मतदानाच्या संकल्पनेला हरताळ फासण्यात आला होता. म्हणून निवडणूक आयोगानं ही खबरदारी घेतली आहे.

VIDEO | गुप्त मतदानाची ऐशीतैशी, मतदानावेळी फेसबुक लाईव्ह, गुन्हा दाखल | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदानाची पद्धत गुप्त राखण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रात जाताना मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

VIDEO | फेसबुकनंतर आता टिकटॉकवरुन मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल | औरंगाबाद | एबीपी माझा


निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना तसं आवाहन केलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानावेळी झालेलं फेसबुक लाईव्ह आणि तिसऱ्या टप्प्यातील टिकटॉकच्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे.

उद्या राज्यात शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, 29 एप्रिल  रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मतदाराला निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत.  सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.

नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.

उस्मानाबादेत मतदान करताना फेसबुक लाईव्ह, चौघांविरोधात गुन्हा