मुंबई : एल्फिन्स्टन पुलावरच्या चेंगरीचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या मयुरेश हळदणकरच्या कुटुंबियांना मदतीसाठी एक स्तुत्य उपक्रम आज मुंबईत सुरु आहे.
अवघ्या 5 रुपयांना वडापाव विकून त्यातून जमा होणारी रक्कम ही मयुरेशच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.
परळमधल्या वडा-पाव विक्रेते मंगेश अहिवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (शनिवार) सकाळी 10 वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात केली असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
रात्री 8 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज मयुरेशच्या कुटुंबीयांना जास्तीतजास्त मदत करण्यासाठी या वडापावच्या गाडीवर नक्की जा.
स्थळ: सारथी हॉटेलसमोर, स्वामी समर्थ मठाजवळ, ज.भा. मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई- 25
एकुलता आधारस्तंभ गमावला
29 सप्टेंबरला एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबीयांनी आपल्या काळजाचा तुकडा गमावला.
वरळीच्या 80 नंबरच्या बीडीडी चाळीत छोट्याशा खोलीत मयुरेश हळदणकर कुटुंबासोबत राहायचा.
घरात तीन-चार लोक मोठ्या मुश्किलीनं झोपतील एवढीच जागा. वडिलांना नोकरी नाही. आईचं सततचं आजारपण. हळदणकर कुटुंबाचा गाडा एकट्या मयुरेशच्या छोट्या खांद्यावर होता.
मयुरेशनंतर आता कुटुंबाची जबाबदारी त्याच्या बहिणीवर आली आहे. तिला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी आता हळदणकर कुटुंब आणि समस्त वरळीकर करत आहेत.